मोरिया (ग्रीक) – ग्रीकमधील लेसबोस बेटावरील शरणार्थ्यांच्या शिबिरामध्ये एकापाठोपाठ एक करून लागलेल्या आगीमध्ये हजारो निर्वासितांना तेथून रातोरात विस्थापित व्हायला लागले आहे. या निर्वासितांना गेल्या 4 दिवसांपासून उघड्या मैदानावरच मुक्काम करावा लागलेला आहे. कोविड-19 मुळे लॉकडाऊन लागू असलेल्या परिस्थितीत या निर्वासितांना आश्रयासाठी कोणत्याही यंत्रणेकडून मदत केली जात नाही.
मोरिया येथील आश्रय छावणीमधील 35 जणांना करोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर लागू करण्यात आलेल्या विलगीकरणाच्या आदेशांमुळे संतप्त झालेल्या काही रहिवाशांनी मुद्दामच या आश्रय छावणीमध्ये आग लावल्याचा आरोप काही अधिकाऱ्यांनी केला.
शुक्रवारी संपूर्ण आश्रय छावणी भस्मसात झाल्यानंतर या निर्वासितांना उघड्या मैदानावरच मुक्काम करावा लागला. या बेटावरून जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी हजारो जणांनी निदर्शने करायला सुरुवात केली आहे. मात्र त्यांना या बेटावरून जाऊ देणे हा युरोपीय संघाच्या नियमांचा भंग ठरणार आहे. कारण या शरणार्थ्यांनी आश्रय मिळवण्याच्या अटीवर तुर्कीतून ग्रीकमध्ये पलायन केलेले आहे. मोरिना येथील आश्रय छावणीत 2,750 जणांच्या मुक्कामाची सोय केली गेली आहे. मात्र या ठिकाणी 12 हजारपेक्षा अधिक शरणार्थी दाटीवाटीने राहात आहेत.