पुणे : अखेर भिलारेवाडी परिसरात बिबट्या जेरबंद

आठवड्याभरापूर्वी दिसले होते 2 बिबटे

कात्रज – गेल्या काही दिवसांपूर्वी भिलारेवाडी पाझर तलावाजवळ दोन बिबट्यांचे दर्शन नागरिकांना झाले होते. त्यामुळे भीतीचे वातावरण असताना त्यातील एकाला वनविभागाने जेरबंद केले आहे; तर अन्य एका बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

भिलारेवाडी परिसरात बिबट्याने एका वासरावर हल्ला केला होता; तर कात्रज बोगद्याजवळ एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. तेव्हापासून वनविभागाने बिबट्या येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन खासगी भागांमध्ये दोन पिंजरे लावले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कात्रज घाट भिलारेवाडी परिसराजवळील खासगी दूध डेअरीसमोर एक नर बिबट्या जेरबंद झाला. त्याला कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या अनाथालयात दाखल करण्यात आले आहे. या बिबट्याचे अंदाजे वय चार वर्षे एवढे आहे, अशी माहिती वनसेवक संतोष धनावडे यांनी दिली. तर नागरिकांच्या मते या परिसरात अजूनही दोन बिबटे फिरत आहेत.

खासगी क्षेत्रात लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा सुमारे चार वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. एकूण दोन पिंजरे लावण्यात आले होते. अजूनही पिंजरे त्या परिसरात आहेत. पकडलेला बिबट्या कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात सुरक्षित आहे.
– समीर इंगळे, वनपाल, खेडशिवापूर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.