वॉशिंग्टन – ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या आठवड्याच्या अखेरीस जगभरातील 4,500 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊनमध्ये अडकण्याची भीती आणि प्रवासी निर्बंधांची शक्यता यामुळेही नाताळची सुटी असूनही प्रवाशांनी परदेश प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शुक्रवारी दिवसभरात 2,401 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तर 10 हजारांपेक्षा अधिक विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला होता, असे विमान प्रवासांची माहिती देणाऱ्या एका संकेतस्थळाने म्हटले आहे.
नाताळच्या पूर्वसंध्येला 1,779 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर 402 विमानांचे उड्डाण शनिवारवर ढकलण्यात आले असल्याचेही या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. यामध्ये अमेरिकेतील विमान कंपन्यांच्या विमानांचाही समावेश आहे. युरोपाबरोबर अमेरिकेतही ओमायक्रॉनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. ही संख्या आता आशिया खंडातही वाढायची लक्षणे दिसू लागली आहेत.