पुणे – सलग तिसऱ्या दिवशी दाट धुक्यांमुळे पुण्यातील विमान सेवेला फटका बसला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले असून, काही प्रवाशांना ताटकळत विमानतळावर बसावे लागले. मंगळवारी (दि. 16) पुण्यात येणारी आणि जाणारी अशी १२ विमान उड्डाणे रद्द झाली.
दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतांश भागात कडाक्याची थंडी आणि दाट धुके पडत आहे. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीसह हवाई वाहतुकीवर झाला आहे. मागील तीन दिवसांपासून पुण्यात येणारी आणि जाणारी अशी 45 ते 50 हून अधिक विमाने रद्द झाली आहेत. तर, अनेक विमानांना उशीर झाला आहे.
यामध्ये मंगळवारी पुण्यात येणारी सात आणि पुण्यातून जाणारी पाच अशी बारा विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामध्ये दिल्लीच्या सहा विमानांचा समावेश आहे. तर, चंडिगढ, गुवाहटी, गोवा या शहरातील विमानांची उड्डाणे रद्द झाली. शिवाय, अनेक विमानांना उशीर देखील झाला.