शेगाव – 13 फेब्रुवारी म्हणजेच आज ‘श्री गजानन महाराज’ यांचा 145 वा प्रकट दिन असून, या निमित्ताने आज संपूर्ण शेगाव श्री गजानन महाराजांच्या गजराने दुमदुमलेलं पाहायला मिळत आहे. आज फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश आणि गुजरात इथनंही आलेल्या पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत. “श्री गजानन महाराज की जय… गणगण गणात बोते..” च्या जयघोषात अवघं शेगाव दुमदुमुन निघालं असून सगळीकडे अतिशय प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, श्री गजानन महाराज यांचा 145 वा प्रकट दिन असून, भाविकांना दर्शन सुलभ व्हावं यासाठी मंदिर 24 तास संस्थांनच्या वतीने खुलं ठेवण्यात आलं आहे. मुखदर्शन, कळस दर्शन, भुयार दर्शन अशा तीन प्रकारे भाविकांना दर्शन खुलं करण्यात आलं आहे. आज गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त संपूर्ण मंदिरात सुंदर सजावट, रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे.
श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते.महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराज यांच्यामुळे नावारुपाला आले आहे. प्रकट दिन हा बुलडाण्यातल्या शेगाव इथं शुभ दिवसाच्या रुपात साजरा केला जातो. या दिवशी शेगाव इथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि श्री गजानन महाराजाच्या पादुकांचे पूजन केले जाते. या दिवशी संपूर्ण शेगावात पूजा, आरती,अभिषेक, पालखी, पारायण पाहायला मिळतं.