पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी शरद पवारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्यूत्तर देत, मी अनेक निवडणुका पाहिल्या आणि १४ निवडणुका जिंकल्या, त्यामुळे ज्यांनी कधी मैदान पहिलं नाही त्यांच्या तोंडी मैदानाची भाषा शोभत नाही, असे म्हणत एकदा मैदानात येऊन तर दाखवा, असा टोला शरद पवारांनी यावेळी लगावला.
पुढे बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत, या लोकांनी कधी शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच केवळ सध्याच्या सरकार आणि खासदारांच्या दुटप्पी कारभारामुळेच पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ रखडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.