पुणे, दि. 20 – (विजयकुमार कुलकर्णी ) वडिलांचे छत्र हरपल्याने गरजा भागविण्यासाठी झगडणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थ्याचे आर्मी ऑफिसर होण्याचे स्वप्न सकार होणार आहे. नैसर्गिक पालक असतानाही 11 वर्षीय मुलाला तो 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत महिलेला कायदेशीर पालक होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी.पी. शिरसट यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. कायदेशीर पालकत्वाला मान्यता दिलेली महिला एका कंपनीची संचालक आहे. तिनेही सामाजिक भावनेने या मुलाचे पालकत्व घेऊन समाजात एक आदर्श निमाण केला आहे.
कात्यायिनी महेश असे कायदेशीर पालक घोषित केलेल्या पालकाचे नाव आहे. त्यांनी ऍड. हेमंत वाघ यांच्यामार्फत कस्टोडियन अँड गार्डियन शिप ऍक्ट 7 अंतर्गत या मुलाचे कायदेशीर पालक होण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. कात्यायिनी या सायबरनेटिक टेक्नोलॉजीज कंपनीच्या संचालक आहेत. त्या अविवाहित असून, मागील दहा वर्षांपासून सामाजिक कार्य करतात. माधवी (नाव बदलेले आहे) ही विधवा असून, तिच्या पतीचे जून 2012 मध्ये अपघातामध्ये निधन झाले. त्यांची परिस्थिती हलाखीची होती. स्वयंसेवी संस्थांची मदत आणि घरकाम करून त्या उपजिविका करत. मात्र, करोना लॉकडाऊनच्या काळात घरकामे गेली. परिणामी, मुलासह जगायाचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यावेळी त्यांनी कात्यायिनी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तिला आर्थिक मदत केली. तिची आणि मुलाची काळजी घेतली. वैद्यकीय खर्च उचलला. दोघांचे दु:ख त्या समजू शकत होत्या. त्यांनी 18 वर्षापर्यंत त्या मुलाचे कायदेशीर पालक होण्याचे ठरविले. तिनेही त्याला सहमती दिली. न्यायालयाच्या परवानगीनंतर कात्यायिनी यांनी मुलाला शिवाजीनगर येथील आर्मी स्कूलमध्ये ऍडमिशन मिळवून दिले.
न्यायालयाच्या या निर्णयाचा दुरगामी परिणाम होणार आहे. एका मुलाचे भवितव्य बदलणार आहे. भविष्यात तो आर्मी अधिकारी बनणार असल्याची मला खात्री आहे.
– ऍड. हेमंत वाघ, अर्जदारांचे वकील
न्यायालयाकडून कौतुक
नैसर्गिक पालक असताना कायदेशीर पालक नेमता येतो का, असा प्रश्न न्यायालयासमोर होता. मात्र, याबाबत बाजू पटवून दिली. त्यानंतर न्यायालयाने हा अर्ज मान्य केला. न्यायालयाने अर्जदार कात्यायिनी महेश यांचे कौतुक केले. त्या कोणताही स्वार्थ न ठेवता सामाजिक कार्य करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयामुळे मुलाचे भवितव्य सुखकर बनले आहे.