पुणे : आयपीएलमधील संघांसाठी गेल्या काही वर्षांत यष्टिरक्षक फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एमएस धोनीने केवळ आयपीएलमध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही यष्टीरक्षक-फलंदाजाची व्याख्या बदलून टाकली आहे. त्याच्या आधी अॅडम गिलख्रिस्ट आणि कुमार संगकारा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक फलंदाजाना प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
आयपीएल 2022 मध्ये लिलावाच्या टेबलवर यष्टिरक्षकांची संख्या जास्त असणार आहे. याशिवाय, सीएसके, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स वगळता इतर सर्व संघ यष्टीरक्षकाच्या शोधात असतील जे फलंदाजीतही तरबेज असतील.
या लेखातून आम्ही 3 यष्टिरक्षकांवर नजर टाकणार आहोत ज्यांना करारबद्ध करण्यासाठी आयपीएल लिलावत सर्वाधिक चढाओढ लागेल.
इशान किशन
पॉकेट डायनामाइट म्हणून ओळखला जाणार्या युवा यष्टीरक्षक इशान किशनने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपली क्षमता सिद्ध केली आहे. आयपीएलमधी छोट्याशा कारकिर्दीत केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याच्या भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा मार्ग मोकळा झाला. मेगा लिलावापूर्वी मुंबईने त्याला करारमुक्त केले आहे. मात्र, मुंबई इंडियन्स त्याला परत करारबद्ध करण्यासाठी कसर सोडणार नाही व इशानच्या कौशल्यांचा फायदा घेण्यासाठी इतर संघही उत्सुक असणार आहेत. त्यामुळे यंदाच्या लिलावात इशान चांगलाच मालामाल होऊ शकतो.
जॉनी बेअरस्टो
सनरायझर्स हैदराबादसाठी जॉनी बेअरस्टोने केलेली कामगिरी पाहता, आगामी मेगा लिलावात जॉनी बेअरस्टो हा सर्वात महागडा यष्टीरक्षक ठरु शकतो. त्याचे सलामीला फलंदाजी करण्याचे कौशल्य इतरांपेक्षा वेगळे ठरवते. यासह बेअरस्टो सांघिक संयोजनाच्या बाबतीत तो एक महत्त्वाचा खेळाडू ठरतो. त्यामुळे बेअरस्टोला करारबद्ध करण्यासाठी सर्वच संघामध्ये चढाओढ असणार यात शंका नाही.
क्विंटन डी कॉक
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज हा आणखी एक असा खेळाडू आहे ज्याच्यासाठी संघ पैसे खर्च करायला मागे पुढे पहाणार नाहीत. डी कॉक आयपीएलमध्ये अनेक संघांसाठी खेळला आहे आणि त्या सर्वांसाठी तो प्रथम पसंतीचा यष्टीरक्षक होता. कुशल यष्टीरक्षणासह आक्रमक फलंदाजी करण्याच्या क्षमतेमुळे डी कॉकला यंदाच्या लिलावात 8 ते 10 कोटी रुपये मिळू शकतात.