पुणे : 3 फेब्रुवारी 1966 मध्ये जन्मलेला डॅनियल काइल डॅनी मॉरिसन हा न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आहे, जो सध्या त्याच्या समालोचनासाठी आणि क्रिकेट जगतातील सर्वात रंगतदार पात्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. न्यूझीलंडच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या मॉरिसनकडे एक विलक्षण आऊट स्विंगर होता. डॉनीला दिग्गज सर रिचर्ड हॅडली यांचा उत्तराधिकारी म्हणून ओळखले जात होते, कारण त्याने हॅडली यांच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंडचा मुख्य गोलंदाज म्हणून अनेक वर्षे जबाबदारी पार पाडली.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, डॉनी समालोचक आणि क्रिकेट विश्लेषक बनला. इतकेच नव्हे तर आजच्या घडीला डॅनी जगातिल सर्वोत्तम क्रिकेट समालोकांमध्ये अव्वल आहे.
डॅनी मॉरिसनच्या 57व्या वाढदिवसानिमित्ती, या लेखातून डॅनी विषयीच्या खास गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत.
1. पदार्पणाच्या सामन्यात गावसकरांकडून धुलाई
मॉरिसनने 1987 च्या विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या स्पर्धेत भारताचे पुढील फेरीतील स्थान निश्चित झाले होते, तर न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना फक्त औपचारीकता होता. नागपूर येथि या सामन्यात, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 221 धावा केल्या होेत्या. पुढे भारताने नऊ विकेट्स आणि 107 चेंडू शिल्लक राखून सामना जिंकला. या सामन्यात, सुनील गावसकर यांनी मॉरिसनसह सर्वच गोलंदाजांची धुलाई करत फक्त 88 चेंडूत 103 धावा केल्या. मॉरिसनने त्याच्या 10 षटकांच्या स्पेलमध्ये सर्वाधिक धावा 69 दिल्या आणि एकही विकेट घेता आली नाही.
2. भारता विरुद्ध हॅट्रिक
25 मार्च 1994 रोजी न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील एकदिवसीय सामन्या दरम्यान, मॉरिसनने अविश्वसणीय गोलंदाजी केली ज्यामुळे संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटले. कपिल देव आणि संजय मांजरेकर खेळपट्टीवर असताना भारताची अवस्था 6 बाद 206 धावा अशी होती. भारताला हा सामना जिंकण्यासाठी आणखी 35 धावांची गरज होती पण नंतर 48व्या षटकात मॉरिसन आला आणि त्याने सलग तीन चेंडूवर तीन बळी घेतले. त्याच्या या हॅट्रिकमध्ये कपिल देव, सलील अंकोला आणि नयन मोंगिया यांचा समावेश होता. अशा प्रकारे तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला. तर यामधील तीनही फलंदाजांनी त्रिफळाचीत करत हॅट्रिक घेणारा एकूण तिसरा गोलंदाज ठरला.
3. द डकमन नावाने प्रसिद्ध
मॉरिसन त्याच्या धारदार गोलंदाजीसाठी जितका प्रसिद्ध होता तितकाच तो फलंदाजीत कुप्रसिद्ध होता. कारण कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणार्या न्यूझीलंडच्या फलंदाजांमध्ये तो दुसर्या स्थानी आहे. त्याच्या 48-कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत, मॉरिसन 24 वेळा शून्यावर बाद झाला आहे. या विक्रमामुळे त्याला त्याच्या संघ सहकार्यांनी द डकमन हे टोपणनाव दिले होते.
4. सामना वाचवणारी खेळी
जानेवारी 1997 रोजी ऑकलंडच्या ईडन पार्क येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत, मॉरिसनने सामन्याच्या दुसर्या डावात कसोटी कारकिर्दीतील आपली सर्वोत्तम खेळी केली. न्यूझीलंडची 9 बाद 142 धावा अशी अवस्था असताना न्यूझीलंड कसोटी गमावण्याच्या मार्गावर होता. यावेळी मॉरिसनसह खेळपट्टीवर नॅथन अॅस्टल हा एकमेव मधल्या फळीतील फलंदाज होता. अॅस्टलने 214 चेंडूत 102 धावांची खेळी केली आणि दुसर्या टोकाला मॉरिसनने 133 चेंडूंचा सामना करत नाबाद 14 धावा करून त्याला चांगली साथ दिली. पाचव्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या नऊ बाद 248 धावा झाल्या होत्या. अशा पद्धतीने चिवट फलंदाजी करत मॉरिसनने अॅस्टलसह सामना वाचवला.
5. दुर्मिळ कामगिरी
मॉरिसन हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा गोलंदाज आहे ज्याने पहिल्या डावात एकही बळी न घेता 100 हून अधिक धावा दिल्या आणि त्यानंतर दुसर्या डावात दमदार पुनरागमन करत 5 फलंदाजांची शिकार केली आहे.
अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज पाकिस्तानचा इम्रान खान होता. ज्याने 1976-77 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे पहिल्या डावात 115 धावा देत एकही बळी मिळवला नव्हता. परंतु इम्रानने दुसर्या डावात त्याने 122 धावांत 5 बळी घेतले होते. दुसरीकडे मॉरिसनने सेंट जॉन्स, अँटिग्वा अशीच कामगिरी केली होती. 1995-96 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात मॉरिसनने 124 धावा देत एकही फलंदाज बाद केला नाही. तर दुसर्या डावात 61 धावांत 5 गडी बाद केले.
6. दोन पुस्तकांचा लेखक
निवृत्तीनंतर लवकरच, डॅनी मॉरिसनने त्याचे आत्मचरित्र ’मॅड अॅज आय वॉना बी’ प्रकाशित केले. मॉरिसनने नंतर आणखी एक पुस्तक लिहिले, डॅनी मॉरिसन ज्युनियर क्रिकेट डायरी, हे महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंसाठी स्वयं-मदत पुस्तक आहे.