पुणे -गदिमा प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा गदिमा पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध चित्रकार साधना बहुळकर यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे चैत्रबन पुरस्कारा’चे तर, युवा गायिका योगिता गोडबोले या विद्या प्रज्ञा पुरस्कारा’च्या मानकरी आहेत. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून 14 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार आणि समीक्षक सुरेश खरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
गदिमांचे ज्येष्ठ पुत्र श्रीधर माडगूळकर यांच्या पत्नी शीतल यांनी लिहिलेल्या आठवणींवर आधारित गदिमांच्या पंचवटीतून’ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार आहे. उत्तरार्धात गदिमांचे बंधू डॉ. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा आणि लता’ हा गदिमा गीतांचा कार्यक्रम महक संस्थे’च्या मनीषा निश्चल आणि सहकारी सादर करणार आहेत, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी दिली.