लोणावळा-लोणावळा शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्वाच्या असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम येत्या जुलै 2023 पर्यत पूर्ण होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे उपमुख्य अभियंता सचिन मुंगसे पाटील यांनी दिली.
रेल्वे प्रशासनाकडून या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य कैलास वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोणावळा नगरपरिषदेमध्ये रेल्वे विभागाशी संबंधित विविध मुद्दयांवर नागरिकांची चर्चा झाली. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या प्रयत्नांमुळे कैलास वर्मा यांनी लोणावळा रेल्वे स्थानकाला भेट दिली. तसेच भांगरवाडी रेल्वे गेट व उड्डाणपुल कामाची पाहणी केली. त्यानंतर लोणावळा नगरपरिषद कार्यालयात जनतेशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.
यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासन पंडीत पाटील, माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर, कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, अर्जुन पाठारे, उपमुख्याधिकारी भगवान खाडे, लोणावळा नगरपरिषदेच्या बांधकाम अभियंता वैशाली मठपती आदी उपस्थित होते.
यावेळी कैलास वर्मा म्हणाले, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्व रेल्वे फाटके बंद करत मार्च 2023 पर्यत रेल्वे गेटच्या जागेवर उड्डाणपुल व भुयारी पुल बांधण्याचा मानस आहे. गती शक्ती उपक्रमान्वये ही कामे करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर लोणावळ्यातील उड्डाणपुलाचे काम सहा महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न राहिल. लोणावळा रेल्वे स्थानकाची उंची देखील कमी असल्याने ती वाढविण्यासाठी रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे पाठपुरावा तसेच कर्जत लोणावळा दरम्यान एक मेमो गाडी सुरु करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.
रेल्वे स्थानकावर हॉकर्स म्हणून काम करणाऱ्या स्थानिकांना अधिकृतपणे व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीनेदेखील विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
बंद थांबा पूर्ववत सुरु करण्याचे आश्वासन
लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातील समस्यांबाबत रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी व रेल्वे बोर्डात चर्चा करून लोणावळा रेल्वे स्थानकाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. रेल्वे ही नागरिकांना सेवा, सुविधा देणारी असल्याने येथील बंद केलेला थांबा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ, लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.