राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील अंध, दृष्टीहीन मतदारांना ब्रेल लिपीतील मतदार स्लिपचे वाटप क्षेत्रिय अधिका-यांनी घरोघरी जाऊन करण्यात येत असल्याची माहिती सह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.
खेड तालुक्यातील 269 दृष्टीहीन अंध मतदार असून निवडणुक आयोगाने खास ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपा तयार करुन देण्यात आल्या असून अंध मतदारांना घरी जागेवर जाऊन नेमण्यात आलेल्या झोनल ऑफिसरच्या माध्यमातून वाटप करण्यात आल्याची माहिती दिव्यांग कक्ष प्रमुख अनिकेत पालकर यांनी दिली.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील एकूण 269 अंध मतदार हे 154 मतदान केंद्राच्या अखत्यारीत येतात. मतदानकेंद्रावरील केंद्राध्यक्षाकडे ब्रेललिपीतील मतपत्रिका चिन्हासह ठेवण्यात येणार आहे. मतदानासाठी आलेल्या अंध मतदारांना ब्रेललिपीतील मतपत्रिकेचे वाचन करण्यास दिली गेल्यानंतर मतदानकक्षातून मतदान करता येणार आहे.
68 ज्येष्ठ करणार घरीच मतदान
तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या केलेल्या मागणीनुसार 68 मतदारांच्या घरी जाऊन पथकामार्फत योग्य ती काळजी घेऊन मतदान सोय करण्यात आली आहे. या आठवड्यात ही प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत जोगेंद्र कट्यारे यांनी दिली.
राजगुरूनगर : अंध, दृष्टीहीन मतदारांना घरोघरी जाऊन ब्रेल लिपीतील मतदार स्लिपचे वाटप करताना क्षेत्रिय अधिकारी.