बेल्हे, (वार्ताहर) – कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र शासनाने मागे घेतल्याने चांगला भाव मिळेल या आशेने आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवारी (दि. 7) कांद्याच्या 32 हजार 821 पिशवींची हंगामातील विक्रमी आवक झाली.
कांदा मार्केटमध्ये जागा नसल्या मुळे मार्केटच्या बाहेर हजारो पिशव्या टाकण्यात आल्या होत्या. एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोला 200 रूपये बाजारभाव मिळाला आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती संजय काळे, संचालक प्रितम काळे, सचिव रुपेश कवडे व व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढ्यांत एक नंबर 10 किलोस 180 ते 200, दोन नंबर 160 ते 180, तीनंबर गोल्टी कांद्यास 120 ते 150, चार नंबर बदला, चिंगळी कांद्यास 10 किलोस 50 ते 120 रुपये बाजारभाव मिळाला.
दरम्यान येथील बाजार समीतीत या आठवड्यात कांद्याची मोठी आवक झालेली असताना देखील बाजारभावात किलोला 5 ते 6 रूपये बाजारभावात वाढ झाली आहे, माहिती संतोष कु-हाडे, विजय कु-हाडे, अनिल गडगे, शिवप्रसाद गोळवा, ज्ञानेश्वर गाढवे, संदीप कोरडे यांनी दिली.