पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या कोविड केंद्रांची आवश्यकता असून, या केंद्रांच्या निर्मितीसाठी सामाजिक संस्था सहभागी होत आहेत. यामध्ये पुणे शहरातील आठ प्रमुख गणपती मंडळांनी देखील पुढाकार घेतला आहे.
फर्गसन महाविद्यालयातील “कोविड मुक्ती केंद्राची’ जबाबदारी गणेशोत्सव मंडळांनी घेतली असून, या केंद्रामध्ये एकावेळी सुमारे 400 रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सपकाळ,
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नितीन पंडित, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
ही गणेशोत्सव मंडळे पेलणार जबाबदारी
मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हे शहरातील मानाचे अष्टविनायक गणपती मंडळांनी एकत्रित येऊन पुणे मनपाच्या सहकार्याने कोविड केअर केंद्राची जबाबदारी पेलणार आहेत.