देशभरातील 450 शहरांमधील हवामानाचे मिळणार अपडेटस्
पिंपरी – भारतीय हवामान विज्ञान विभागाने एक मोबाइल ऍप लॉन्च केले आहे. या ऍपचे नाव हे मौसम ठेवण्यात आले आहे असून याच्या मदतीने देशातील 450 शहरांच्या हवामान अपडेट ऑनटाइम कळणार आहेत. हवामानाच्या माहितीसह इशाराही या ऍपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
हवामानाची माहिती देणारा हा पहिला सरकारी ऍप आहे. याआधी असलेले हवामानावर आधरित ऍप जुन्या आकड्यावरून आणि पावसाच्या निरीक्षणावरुन माहिती देत होते. तर विशेष म्हणजे ग्रामीण व शहरी नागरिकांकरिता हे ऍप विकसित करण्यात आले आहे.
आतापर्यंत केवळ हवामान विभागाच्या संकेतस्थळावर हवामानासंदर्भात उपग्रहातून घेतलेली छायाचित्रे दाखविण्यात येत होती. आता या ऍपमध्ये हवामानाचा अंदाज आणि पूर्व अंदाजासह रडार आणि उपग्रहाहून घेण्यात आलेले फोटोही दाखविण्यात येणार आहेत.
पुढील वर्षी हे ऍप हायपरलोकल मॅप्स आणि क्षेत्रीय भाषांच्या पर्यायासह आपला विस्तारण्याचा हवामान खात्याचा मानस आहे. पुढील वर्षापर्यंत शेतकऱ्यांसाठी काही सुविधा वाढविण्यात येतील. शेतकऱ्यांना जीपीएसच्या आधारे प्रत्येक तीन तासांत अपडेट मिळतील ते देखील त्यांच्या स्थानिक भाषेत याची माहिती मिळवू शकणार आहेत. ग्रामीण क्षेत्राचा नकाशा बनवणे अवघड असल्याने शहरांना या ऍपमध्ये जोडण्यात आले.
करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कारणामुळे या ऍपला उशिर झाला. दरम्यान आयएमडीने सरकारच्या “उमंग’ ऍपमध्ये राज्य आणि केंद्र सेवांच्या बिल भरणाचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये अपडेटचा अभाव होता. आता ती कमतरता “मौसम’ भरुन काढणार आहे.