महापालिकेचा पर्यावरणाचा 2019-20 चा सद्यस्थिती अहवाल मुख्यसभेत सादर
पुणे – लॉकडाऊनच्या काळात शहरातील प्रदूषण नियंत्रणात आले. गेल्या दोन वर्षांत वाहन खरेदीमध्ये घट झाली आहे. याशिवाय शहरात सौरऊर्जेचा वापर वाढला असून, गेल्या 15 वर्षांत शहर आणि परिसरात बांधकामांची संख्या वेगाने वाढल्याचे महापालिकेच्या पर्यावरणपूरक अहवालातून समोर आले आहे.
महापालिकेचा सन 2019-20 चा पर्यावरणाचा सद्यस्थिती अहवाल शुक्रवारी मुख्यसभेत सादर करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे हा अहवाल सुपूर्त केला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे हा अहवाल प्रथमच “सॉफ्ट कॉपी’ म्हणजे पीडीएफ स्वरूपात सादर करण्यात आला. त्याची छपाई करण्यात आली नाही. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, अन्य गटनेते आणि पर्यावरण अधिकारी मंगेश दीघे आदी उपस्थित होते.
वैयक्तिक वाहनखरेदी कमी
आरटीओकडे नोंदवलेल्या वाहनांच्या आकडेवारीनुसार, मार्च 2020 पर्यंत 41 लाख 35 हजार 915 गाड्यांचे रजिस्ट्रेशन केले गेले. गेल्या दोन वर्षांत नव्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनचे प्रमाण कमी झाले आहे. खासगी वाहनांमध्ये 2020 पर्यंत 67 लाख 406 दुचाकींचे रजिस्ट्रेशन केले गेले आहे. मार्च 2019 च्या तुलनेत ही संख्या 8 हजार 908 ने कमी आहे. रिक्षा, टॅक्सी, कॅब आणि बसच्या एकूण संख्येचा विचार करता गेल्या पाच वर्षांत सार्वजनिक वाहनांची संख्या 2.4 टक्क्यांनी वाढली आहे.