मऊ (उत्तर) – उत्तरप्रदेशातील डॉन म्हणून ख्याती असलेला मुख्तार अन्सारी याने अगदी अखेरच्या क्षणी निवडणूक रिंगणातून माघार घेऊन आपल्या ऐवजी आपला मुलगा अब्बास अन्सारीला येथून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तथापि असे असले तरी निवडणुकीची सारी सूत्रे मुख्तार अन्सारीच्याच हातात आहेत. या मतदार संघात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान होंणार आहे.
अब्बास अन्सारी हा ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव समाज पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात आहे. हा पक्ष समाजवादी पक्षाच्या आघाडीतील पक्ष आहे. त्यामुळे त्या आधारावर समाजवादी पक्षाचीही त्याला येथे साथ आहे. हाच मुद्दा पकडून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी समाजवादी पक्षावर सातत्याने टीका केली.
मुख्तार अन्सारीला राजकीय आश्रय देणारा पक्ष म्हणून भाजपने समाजवादी पक्षावर व अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. त्यामुळे सपाच्या आघाडीने अगदी अखेरच्या क्षणी मुख्तार अन्सारी याच्या ऐवजी त्याच्या मुलाला यावेळी रिंगणात उतरवले आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षावर हल्ला करण्यासाठी अमित शहा यांनी मुख्तार अन्सारीच्या नावाचा सातत्याने प्रचारात वापर केला होता. योगी आदित्यनाथ सरकारने त्यांच्या मालमत्तेवर कसा बुलडोझर याचेही भांडवल भाजपच्या लोकांनी राज्यभर केले आहे. भाजपने या जागेवर अशोक सिंह यांना उमेदवारी दिली आहे, तर बहुजन समाज पक्षाने प्रदेशाध्यक्ष भीम राजभर आणि कॉंग्रेसचे माधवेंद्र बहादूर सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
मौलाना आणि माफियांना हद्दपार करा असा प्रचार या मतदार संघात केला जात आहे. त्या प्रचाराला प्रत्युत्तर देतान अब्बास अन्सारी याचे म्हणणे असे आहे की भाजपचेच लोक एका विशिष्ट धर्मातील माफियांना आश्रय देत आहेत. दाऊदचा साथीदार असलेला ब्रजेश सिंग याने सत्ताधाऱ्यांच्या मदतीने या भागात दहशत माजवली आणि त्यानेच सन 2001 मध्ये आपले वडिल मुख्तार अन्सारी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या असा त्याचा दावा आहे.
अब्बास याने नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या आकडेवारीचा हवाला देऊन दावा केला आहे की उत्तर प्रदेशमध्ये गेल्या पाच वर्षांत गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.संविधानिक पदावर बसून मुख्यमंत्री अदित्यनाथ हेच लोकांना बुलडोझरची धमकी सातत्याने देत आहेत असा आरोपही त्याने केला आहे.