सुलतानपूर लोकसभा मतदारसंघाचं हे ‘रेकॉर्ड’ मोडण्यात मनेका गांधी यशस्वी

सुलतानपूर – उत्तर प्रदेशातील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या मनेका गांधी यांनी विजय संपादित करत या मतदारसंघातील आजपर्यंत अबाधित असलेलं एक रेकॉर्ड मोडलं आहे. सुलतानपूर या लोकसभा मतदारसंघाकडे आजपर्यंत एक पुरुष प्रधान लोकसभा मतदारसंघ म्हणून पाहिलं जात असे कारण आजपर्यंत येथून एकही महिलेला लोकसभा निवडणुकांमध्ये विजय संपादित करता आला नव्हता मात्र मनेका गांधी यांनी येथून विजय मिळवत सुलतानपूरची पुरुषप्रधान मतदारसंघ ही ओळख यशस्वी रित्या मोडली आहे.

उत्तर प्रदेशातील यंदाच्या लोकसभा निवडणुका ज्या प्रमाणे समाजवादी  पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या प्रदीर्घ काळानंतरच्या आघाडीमुळे चर्चेच्या ठरल्या त्याचप्रमाणे त्या भाजपने लोकसभा उमेदवारांच्या बाबतीत घेतलेल्या काही निर्णयांमुळे देखील चर्चेच्या ठरल्या. भाजपच्या उमेदवारांच्या बाबतीतील अशाच निर्णयांपैकी एक महत्वाचा निर्णय म्हणजे मनेका व वरून गांधी या मायलेकांच्या मतदारसंघांमध्ये करण्यात आलेली अदलाबदल. २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे वरून गांधी यांनी तर पिलिभीत लोकसभा मतदारसंघातून मनेका गांधी यांनी विजय संपादित केला होता. मात्र यंदा भाजपतर्फे सुलतानपूरातून मनेका गांधी यांना तर पिलिभीतमधून वरून गांधी यांना लोकसभेची उमेदवारी देत मायलेकांच्या मतदारसंघांमध्ये आदलाबदल करण्यात आली होती.

सुलतानपूर लोकसभा मतदारसंघाचा आजपर्यंतचा इतिहास पाहिल्यास लक्षात येतं की हा मतदारसंघ नेहमीच पुरुषप्रधान राहिला आहे. 1998 मध्ये पहिल्यांदा समाजवादी पक्षाने या जागेवरून माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या कन्या आणि योगी सरकारमध्ये सध्या मंत्री असणाऱ्या रिटा बहुगुणा जोशी यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यावेळी त्यांना भाजपाच्या जी. व्ही. राय यांनी पराभूत केले होते. एका वर्षांनंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने गांधी परिवाराच्या निकटवर्तीय राहिलेल्या दीपा कौल यांना उमेदवारी दिली. पण त्यावेळी सुद्धा त्यांना विजय संपादित करता आला नव्हता. काँग्रेस उमेदवार असलेल्या दीपा कौल या थेट चौथ्या स्थानावर गेल्या होत्या. या निवडणुकीत बसपाचे जयभद्र सिंह विजयी झाले. 2004 मध्ये भाजपाने डॉ. वीणा पांडेय यांना मैदानात उतरवले. मात्र, त्यांचाही दारुण पराभव झाला. त्याही चौथ्या स्थानावर गेल्या. या निवडणुकीत पुन्हा बसपाचाच उमेदवार विजयी झाला. मोहम्मद ताहीर खान यांना मतदारांनी पसंतीचा कौल दिला होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या जागेवरून कोणत्याच पक्षाने महिला उमेदवार रिंगणात उतरवण्याची जोखीम पत्करली नाही. 2014 मध्ये कॉंग्रेसने डॉ. संजय सिंह यांची पत्नी अमिता सिंह यांना उमेदवारी दिली. मात्र त्याही सुलतानपूरची “परंपरा’ मोडू शकल्या नाहीत व येथून भाजपचे उमेदवार वरून गांधी विजयी झाले.

अशातच यंदा सपा-बसपा आघाडी आणि कॉंग्रेस हे पक्ष रिंगणात असल्यामुळे इथे तिरंगी लढत पाहायला मिळाली. सपा-बसपा आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा बसपाच्या वाट्याला गेल्याने येथून बसपातर्फे चंद्रभद्र सिंह, तर काँग्रेसतर्फे डॉ. संजय सिंह आणि भाजपतर्फे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मनेका गांधी यांनी बसपाच्या चंद्रभद्र सिंह यांचा अवघ्या १४,५२६ मतांनी पराभव करत सुलतानपूर लोकसभा मतदारसंघाचं अबाधित रेकॉर्ड मोडलं आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.