सातारा सिव्हिल हॉस्पिटलचा गलथान कारभार
लोणंद – लोणंद येथील प्रभाग क्रमांक १२ मधील एका ज्येष्ठ महिलेचा सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला. मात्र, अजूनही या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही.
लोणंद येथील महिलेस (वय 65) रविवारी दुपारी अत्यवस्थ वाटत असल्याने खासगी रुग्णालयात घेऊन गेले असता त्यांनी सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यानंतर रूग्णास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी रविवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या स्वॅब घेतला असून सुमारे तीस तास उलटून गेले तरीही रिपोर्ट आला नसल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये असंतोष वाढत आहे.
महिलेचे दोन मुले व एक मुलगी रविवारपासून व्याकूळ अवस्थेत हाॅस्पिटलमध्ये मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी थांबलेले आहेत. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच रिपोर्ट येण्यास विलंब होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्वरीत लक्ष देऊन मृतदेहाची हेळसांड थांबवावी, अशी मागणी नातेवाईक करत आहेत.