वाई – वाई नगरपालिका हद्दीतील शहराच्या दोन्ही भागांना जोडणारा 136 वर्षांपूर्वीचा ब्रिटीशकालीन जुना कृष्णा पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी 13 कोटी रुपयांच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
वाई शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीवर ब्रिटिश सरकारने 1884 मध्ये दगडी बांधकामात आकर्षक पूल बांधला आहे. शहराचा दक्षिणेत्तर भाग या कृष्णा पुलामुळे एकमेकाला जोडला गेला आहे. या आकर्षक पुलावर अनेक चित्रपटांचे चित्रिकरण झाले आहे.
हा पूल शहराची जीवनवाहिनी आहे. कृष्णा पूल नागरी जीवनाशी फारच एकरूप झालेला असून स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनापासून अनेक सांस्कृतिक, सामाजिक चळवळीशी जोडला गेल्याने त्याचे वाईकरांशी एक भावनिक नातेही तयार झाले आहे. हा जुना पूल आता वाहतुकीस अपुरा पडत असल्याने पावसाळ्यात नदीला महापूर आला की तो वाहतुकीस बंद करण्यात येतो. अवजड वाहनांना, एसटी वाहतुकीला हा पूल बंद करण्यात आला आहे.
कृष्णा पूल हा वाईकरांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने हा पूल पाडून नव्याने पूल बांधण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे या पुलाचे आरेखन व खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. पुढील शंभर वर्षाच्या वाहतुकीला उपयुक्त ठरेल, अशा दृष्टीने पुलाचे नियोजन करण्यात आले आहे.
वाई शहरातील कृष्णा नदीवरील हा पूल जुना वाहतुकीस व रहदारीस अयोग्य झाला आहे, तो पाडून नवीन बांधण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 13 कोटी रुपये वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी शंभर टक्के निधी शासन देणार असून पालिकेच्या अखत्यारीत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
पालिकेच्या उत्पन्नातून हे काम होऊ शकत नसल्याने शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या कामास शासनाने मंजुरी दिली आहे. लवकरच या कामाच्या ई निविदा प्रसिद्ध होतील. एक वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले. सर्व वाईकरांच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.