चार बंद घरांचे कुलूप तोडले
मंचर- आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक-हिंगेवस्ती येथील चार बंद घरांचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकुण 20 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि. 13) पहाटे चोरुन नेला. तसेच बंद घरातील कांदे आणि लसुण देखील चोरुन नेले आहेत. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हिंगेवस्ती येथील चवरे मळ्यातील आशा सुरेश चवरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील 10 हजार रुपये, साड्या, चांदीची जोडवी, सोन्याची चमकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. त्यांच्या शेजारी राहत असलेल्या शरद मार्तंड चवरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 7 किलो कांदे आणि 1 किलो लसुण चोरट्यांनी लंपास केला. त्यानंतर चोरटे काळआंबा वस्तीतील निवृत्ती नामदेव हिंगे यांच्या घरातील बंद घराचे कुलूप तोडून साड्या चोरुन नेल्या. लक्ष्मण भगवंत हिंगे यांच्याही बंद घरातील कपड्यांच्या बॅगा व लोखंडी कपाटातील किरकोळ सामान चोरुन नेले आहे.
कल्याणराव हिंगे पाटील, सागर शिंदे पाटील यांनी चोरी झाल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याला कळविली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस कर्मचारी राजेंद्र हिले, वाय. पी. रोडे, चंद्रशेखर डुंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावागावात भंगार गोळा करणारे, साड्या व भांडी विकणारे अनेक जण वाड्या-वस्त्यांवर फिरत आहेत. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने हे व्रिकेते रात्रीच्या वेळी चोरी करीत असावेत, असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी अवसरी खुर्द गावात पाच ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. तो सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही अद्यापपर्यंत पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आले नाही.