मंचर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने मंचर, अवसरी खुर्दसह इतर गावांत रविवारी (दि. 13) पोलीस संचलन करण्यात आले. यामध्ये 50 रायफलधारी कंमांडो आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस सहभागी झाले होते.
सोमवारी (दि. 21) विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्यात मुख्य लढत होत आहे. मतदान शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावे, यासाठी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या उपस्थितीत मंचर, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव येथे पोलीस संचलन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अर्जुनराव शिंदे, गुप्तचर विभागाचे विनोद गायकवाड यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.