फलटण येथील घटना दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडले
चलाख चोरट्यांकडून पीपीई किटस्चा वापर
फलटण (प्रतिनिधी) – शहराच्या मध्यवर्ती भागात, रविवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत हिराचंद कांतेलाल सराफ अँड सन्स या दुकानाची भिंत फोडून शनिवारी (दि. 4) मध्यरात्री चोरट्यांनी तब्बल 788 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. कोव्हिड वॉर्डमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचारी वापरतात तशी पीपीई किटस् चोरट्यांनी परिधान केली होती. त्यामुळे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद होऊनही त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. या चोरीने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
येथील रविवार पेठेतील मेहता हाइटस् या इमारतीत हिराचंद कांतेलाल सराफ अँड सन्स ही जुनी पेढी असून सध्या तिसरी पिढी व्यवसायात आहे. या दुकानाचे नूतनीकरण करताना मालक स्वप्निल अनिल शहा यांनी मजबूत शटर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षित तिजोरी, धोक्याची सूचना (अलार्म) देणारी यंत्रणा, असा चोख बंदोबस्त केला होता; परंतु चोरट्यांनी या व्यवस्थेला छेद देत भिंतीला छोटे भगदाड पाडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानाच्या डिस्प्लेमध्ये लावलेले सोन्याचे दागिने, अंगठ्या, साखळ्या, अशा एकूण 788 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
दुकानातील चांदीच्या व एक ग्रॅमच्या सोन्याच्या दागिन्यांना चोरट्यांनी हातही लावला नाही. चोरटे माहीतगार असावेत. तिजोरी अथवा शटरला स्पर्श झाल्यास भोंगा वाजणार असल्याची माहिती चोरट्यांना बहुधा असावी. त्यामुळे त्यांनी तिजोरीलाही हात लावला नाही. भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश करण्यापूर्वी तेथे असलेला सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी फिरवून ठेवला. दुकानातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झाले असले तरी त्यांनी करोनापासून बचावासाठी असलेली पीपीई किटस् परिधान करुन आल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण होणार आहे. या चोरीची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ, पोलीस उपनिरीक्षक बनकर व कर्मचाऱ्यांनी दुकानाची कसून पाहणी केली. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले होते. त्यांचा अहवाल तपासात उपयुक्त ठरेल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली.
सुरक्षारक्षकांचा अभाव
फलटण शहरातील जुन्या सराफी पेढ्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नव्याने व्यवसाय सुरू केलेल्या व्यापाऱ्यांनी पुणे, मुंबईप्रमाणे आकर्षक शोरूम्स उभारल्या आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातही अनेक सराफी दुकाने सुरू आहेत; परंतु मोजक्या दोन-चार सराफांनीच सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत. बाकीच्या सराफांची भिस्त प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरे, मजबूत शटर्स व तिजोऱ्या, अलार्म सिस्टीम यावर असल्याचे दिसते. दहा वर्षांपूर्वी शहरातील अशोक ज्वेलर्समध्ये धाडसी चोरी करून कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता, त्यानंतर शहरात झालेली ही मोठी चोरी आहे.