पुणे – महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल हे पुढील दोन ते तीन दिवस सेल्फ क्वारंटाइन असतील. महापौर मुरलीधर मोहोळ यांचा करोना अहवाल येण्यापूर्वी बैठकांच्या निमित्ताने त्यांच्या सर्वाधिक संपर्कात आले होते.
महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाला. त्यानंतर मागील दोन दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्यात येत आहे. त्यात करोनाची सद्यस्थिती आणि पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्ट स्थापनानिमित्त झालेल्या आढावा बैठकांमध्ये अतिरिक्त आयुक्त अग्रवाल आणि आरोग्य प्रमुख डॉ. हंकारे सर्वाधिक संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी सेल्फ क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, महापौरांच्या संपर्कात आले, तरी लगेच दुसऱ्या दिवशी करोना चाचणी केल्यास अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील दोन ते तीन दिवस हे अधिकारी करोनाच्या लक्षणे दिसण्याची वाट पाहणार असून त्यानंतरच आपली चाचणी करणार आहेत.
महापौरांना करोना संसर्ग होण्याच्या दोन दिवस आधी आमचा वारंवार त्यांच्याशी संपर्क आला होता. बैठका तसेच करोनाच्या आढाव्यानिमित्ताने ही भेट झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सेल्फ क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.
– डॉ. रामचंद्र हंकारे, महापालिका, आरोग्य प्रमुख