पिंपरी – कॅनरा व ऍक्सिस बॅंकेचे एमटीएम फोडताना दोन चोरट्यांना पिंपरी पोलिसांच्या गस्तीवरील पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 11) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास खराळवाडी, पिंपरी घडली.
चैतन्य पांडूरंग चौधर (वय 22) आणि भानुदास अण्णा दिघे (वय 23, दोघेही रा. कोयाळीगाव, आळंदीजवळ, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी स्वप्नील नंदकिशोर झणकर (वय 33) यांनी शुक्रवारी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी रमेश दोरताले, स्वप्नील झणकर, प्रशांत जाधव आणि अमन सय्यद हे पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास खराळवाडी, पिंपरी येथील कॅनरा आणि ऍक्सिस बॅकेचे एटीएममध्ये दोघेजण संशयास्पद रित्या आढळून आले. पोलिसांनी जवळ जाऊन पाहणी केली असता ते दोघेजण पहार आणि पक्कडच्या सहाय्याने एटीएम फोडत असल्याचे दिसून आले. आरोपी चौधर आणि दिघे यांनी एमटीएममधील सीसीटिव्ही देखील फोडले होते. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.