पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) बस थांबा कोसळून शुक्रवारी (दि. 11) दोघे प्रवासी जखमी झाले आहेत. पिंपरी येथील चौकात दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. जुन्या बस थांब्यांकडे पीएमपीएमएलचे दुर्लक्ष होत असल्याची बाब या अपघाताने अधोरेखित झाली आहे.
इमरान खान (वय – 28, रा. दापोडी), इंद्रजित जयस्वाल (वय – 30, रा. रेसकोर्स, पुणे) असे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. त्यांना पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खान यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांना 20 टाके द्यावे लागले. तर, जयस्वाल यांच्या दोन्ही हाताला मार लागला आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. हे दोघे बसची वाट पाहत बस थांब्याखाली थांबले होते. तर, पीएमपीएमएलच्या बसथांब्यावर चढून दोघे जण जाहिरातीचा बॅनर लावत होते. त्या वेळी हा अपघात घडला.
पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले, पिंपरीतील बस थांबा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. येथील बस थांब्याजवळ खोदकाम केल्याचे सध्या आढळत आहे. बस थांबा कोसळण्याचे कारण आणि त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याविरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.