पुणे – “शाईफेकीचा कट पूर्व नियोजित होता आणि याचे सर्व पुरावे मिळाले आहेत. माझ्या डाव्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळ्याच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले होते. त्यावर शाई टाकली गेली. निषेध करायला हरकत नाही, पण मग मला भ्याड हल्ला करून मारण्याचा हा प्रयत्न होता का?’ असा सवाल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शाईफेकीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “लोकशाही पद्धतीने निषेध नोंदवण्यास माझा कोणताही विरोध नव्हता. मात्र, ज्या पद्धतीने हल्लेखोरांनी माझ्यावर शाईफेक केली, ती राज्यघटनेला धरून नव्हती. मी दिलगिरी व्यक्त करूनही हा भ्याड हल्ला झाला. ही बाब घटनेच्या कोणत्या चौकटीत बसते? माझ्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्याबद्दल कोणताही अनादर नाही. तरीही कोणाचे मन दुखावले असेल तर त्याची मी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त केली होती.’
भुजबळ जामिनावर आहेत…
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केलेल्यांवर गंभीर कलम का लावले, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यासंदर्भात पाटील म्हणाले, “छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत. हे त्यांनी लक्षात असू द्यावे, अशी आठवण त्यांनी करून दिली. प्रशासनाने त्यांचे काम केले आहे. आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. भुजबळ यांनासुद्धा न्यायदेवतेने जामीन दिला आहे. त्यामुळे त्यांनीही न्यायदेवतेवर विश्वास ठेवावा.’