‘त्यांनी’ आता अंत पाहू नये ; विधानपरिषदेच्या रखडलेल्या नियुक्त्यावरून अजित पवार भडकले

पुणे : विधानपरिषद आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यावरून आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. त्यांना भेटून नियुक्त्या का रखडल्या हे विचारावे लागेल, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यपाल नियुक्त सदस्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, याकडे अजित पवार यांचं लक्ष वेधण्यात आले. त्यावर ते बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना आम्ही 12 नावे दिली आहेत. सर्व नियम आणि अटी पाळून ही नावे दिली आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्रंही राज्यपालांना देण्यात आले. याशिवाय आम्हाला पूर्ण बहुमत आहे.

सभागृहातही 171 आमदारांचे बहुमत सिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही दिलेल्या नावावर राज्यपालांनी निर्णय घ्यावा, आता राज्यपालांनी अंत पाहू नये, असे अजित पवार म्हणाले.

राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या सर्व करण्यात आल्या आहेत. एवढं सर्व झालेले असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी तेच सही करत नाहीत. त्यामुळे कधी तरी वेळ काढून त्यांना भेटावे लागेल. सही का करत नाहीत हे विचारावे लागेल. किती काळ थांबायचे हे विचारले पाहिजे. शेवटी अधिकार त्यांचा असला तरी काही काळ वेळ मर्यादा आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.