महाविद्यालये सुरू करण्यासाठी नियमावली अद्याप प्रसिद्ध नाही
पुणे – राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घेण्याची जबाबदारी विद्यापीठांवर सोपविली आहे. त्यामुळे परीक्षा ऑनलाइन, ऑफलाइन घेतली तर महाविद्यालयच अथवा ऑनलाइन परीक्षा प्रॉक्टर्डपद्धतीने घ्यायची, या सर्व पर्यायावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून चाचपणी करण्यात येत आहे. यावर येत्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार महाविद्यालयांकडून योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. महाविद्यालये सुरू करण्यासाठी नियमावली अद्याप विद्यापीठाने प्रसिद्ध केली नाहीत. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ही नियमावली असेल. त्यादृष्टीने शिक्षण संस्थांकडून महाविद्यालये सुरू करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलली जात आहे.
दरम्यान, महाविद्यालयाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा महिनाभरात होण्याची शक्यता आहे. या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची, यासंदर्भात परीक्षा विभागाकडून परीक्षा मंडळाची बैठक घेण्यात येत आहे. ही बैठक येत्या आठवभरात होण्याची शक्यता आहे. यात प्रथम सत्राच्या परीक्षेचे गांभीर्य टिकून राहावे, यासाठी विविध पर्यायांवर चर्चा होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ऑनलाइन परीक्षेमुळे निकालाचा टक्का वाढला. विद्यार्थी सामूहिक पद्धतीने ऑनलाइन परीक्षा दिल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले. त्याचीच पुनरावृत्ती यंदाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेत होता कामा नये, यासाठी परीक्षा
विभागाकडून विविध पर्याय आजमविण्यात येत आहे.
करोनाचे संकट लक्षात घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्यावर गांभीर्याने विचार करीत आहेत. कारण काही विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकत नाहीत, त्यांना ऑनलाइन परीक्षा देणे सोयीचे होईल. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची कोणतेही गैरसोय होऊ नये, यासाठी दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आताच्या परीक्षेवर विद्यापीठाची नजर
विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला तरी त्यात प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर केला जाणार आहे. बॅकलॉग परीक्षेत हा प्रयोग राबविण्यात आला आहे. त्यामुळे प्रॉक्टर्ड पद्धतीद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यावर चर्चा होणार आहे. महाविद्यालये सुरू होणार असल्याने पर्यवेक्षकाच्या नियंत्रणात ऑनलाइन परीक्षा घ्यायची, असा मतप्रवाह सुरू आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परीक्षेतील त्रुटींतून अनुभव घेत विद्यापीठामार्फत परीक्षेचे महत्त्व अबाधित राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.