पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एकाच दिवशी 27 पोलीस करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यातील 11 जण हे पिंपरी पोलीस ठाण्यातील होते. मात्र रात्री उशिरा आलेल्या माहितीमध्ये पिंपरी पोलीस ठाण्यातील एकही कर्मचारी बाधित नसल्याचे समोर आले. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
पोलिसांना करोना बाधित परिसरात कर्तव्यावर जावे लागते. तसेच ते काम करीत असलेला पोलीस ठाण्याचा परिसर छोटा आहे. पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहांची संख्याही कमी आहे. विविध कामासाठी नागरिक पोलीस ठाण्यात येत असतात. यामुळे पोलिसांना करोनाची बाधा होण्याची शक्यता जास्त असते. पोलिसांना करोनाची बाध होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. करोनाच्या प्रसाराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसोबतच करोनाची चाचणीही केली जाते.
पिंपरी पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांच्या चाचण्या महापालिकेच्या रुग्णालयात करण्यात आल्या. त्यापैकी पिंपरी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह 11 जण करोना बाधित असल्याचे महापालिकेने कळविले. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांची ही चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांना घेतला. घरातील व्यक्ती बाधित आल्याने त्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनाही मानसिक धक्का बसला. मात्र रात्री उशिरा पुन्हा महापालिकेने “ते’ 11 कर्मचारी बाधित नसल्याचे कळविले. महापालिकेच्या या गलथान कारभाराचा मनस्ताप पोलिसांना सहन करावा लागला. मात्र आपण करोना बाधित नसल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.