बीड – माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. पक्ष कोणाचाच नसतो. स्वत: मोदी देखील मी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं सांगतात असं सांगताना बेईमानी आमच्या रक्तात नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमत्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा प्रवास मृत्यूनंतरही कायम आहे ही किमया आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. सामान्य माणसाचा, वंचितांचा नेता म्हणू त्यांच्याकडे आजही आदराने पाहिलं जातं असंही यावेळी त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी 27 जानेवारीला औरंगाबादेत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
“शेवटच्या दिवसापर्यंत भाजपाचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी मी प्रयत्न करत होते. आणि मी बंड करणार अशी पुडी कोणी सोडली. माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही, त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. यावेळी पंकजा मुंडे यांनी मी पक्ष सोडणार नाही असे सांगत, मला भाजपच्या कोअर कमिटीमधून मुक्त करा, अशी मागणी त्यांनी केली.