चिक्कोडी – तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाच्या जैन मुनींची निर्घृण हत्या झाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नंदीपर्वत मठाकडे भाविकांची रीघ लागली होती. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील हिरेकोडी गावातून बेपत्ता झालेले जैन मुनी नंदी महाराज यांची हत्या करण्यात आली आहे. हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाचे श्री १०८ कामकुमार नंदी महाराज हे दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. ६ जुलैपासून जैन मुनी नंदीपर्वत आश्रमातून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान,विधानसभेत विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी जैन मुनी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवावा, अशी मागणी केली. त्यावर सिद्धरामय्या म्हणाले, “जैन मुनी हत्याकांडातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल. जैन मुनींची हत्या हे क्रूर हत्याकांड आहे. ” असं म्हणत ते पुढे म्हणाले, ‘पोलीस एफआयआरमध्ये दोन आरोपींची नावे आहेत. दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. मृतदेह सापडला आहे. पोलिसांचा दोष काय? असा सवाल त्यांनी केला. पोलिस सक्षमपणे तपास करीत आहेत. हत्येमागे कितीही प्रभावशाली लोक असले तरी त्यांना शिक्षा करण्याचे काम आम्ही करू, असंही सिद्धरामय्यांनी स्पष्ट केलं.
तत्पूर्वी, 6 जुलै रोजी भक्तांनी जैन मुनींचा आश्रमाभोवती शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. जैनमुनी आचार्य श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या भक्तांनी ते बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर शुक्रवारी चिक्कोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जैनमुनी कामकुमार नंदी महाराज यांचे नंदीपर्वत आश्रमात गेल्या १५ वर्षांपासून वास्तव्य असल्याचे भाविकांनी सांगितले. चिक्कोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला या तपासात संशयाच्या आधारे दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान जैन मुनींची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी चौकशीत खून करून मृतदेह फेकल्याची कबुली दिली. मात्र, पोलिसांनी रात्रभर कटकबावी गावात मृतदेहाचा शोध घेतला यावेळी मृतदेह सापडला नाही. बेळगावचे एसपी संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.