नवी दिल्ली – भाजपशासित राज्यांमध्ये मुस्लिम आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे केलेल्या भाषणात देशातील एकूण मुस्लिमांपैमी 80 टक्के मुस्लिम मागासवर्गीय समाजातील असल्याचे विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी ही मागणी केली आहे.
भाजपने आता राज्यांमध्ये प्रामाणिकपणे मुस्लिमांसाठीच्या आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करावी आणि त्यांचा शासकीय नोकरीतील अनुशेष भरून काढावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, भाजपने केवळ आरक्षणाला विरोध करू नये तर आरक्षणाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी आणि आपला पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे हे सिद्ध करून दाखवावे असे त्या म्हणाल्या.
देशातील पसमांदा मुस्लिमांना कोणताही लाभ मिळालेला नाही. त्यांना समान अधिकार मिळत नाहीत. त्यांना अस्पृश्य मानले जाते,असे पंतप्रधान मोदी आपल्या भोपाळ येथील भाषणात म्हणाले होते. मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेश, बिहार आणि दक्षिण भारतात विशेषत: केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू आणि इतर अनेक राज्यांमध्ये तुष्टीकरणाच्या धोरणामुळे अनेक जाती विकासापासून वंचित राहिल्या आहेत.