आगामी काळात इंधनाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली – आगामी काळात इंधनाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. या संधीचा भारताने फायदा घेण्याची गरज आहे असे रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले.
इंधन उत्पादन करणारे बरेच देश आवश्‍यकतेपेक्षा जास्त दरवाढ करीत आहेत. त्याचबरोबर काही देश यातून मिळालेला नफा दहशतवादासाठी वापरत आहेत. त्यामुळे इंधनाच्या क्षेत्रात आपण शक्‍य तितक्‍या लवकर आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यायी इंधन क्षेत्रावरील परिसंवादात बोलताना गडकरी म्हणाले की, ग्रीन हायड्रोजन सध्याच्या परंपरागत इंधनापेक्षा कार्यक्षम आणि पर्यावरणाची हानी न करणारे इंधन आहे. या क्षेत्रात भारताने संशोधन आणि विकासासह उत्पादन केल्यास भारत ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण तर होईलच त्याचबरोबर भारत निर्यातही करू शकणार आहे.

इंधनाबरोबरच ऍल्यूमिनियम आणि तांब्याची आयात कमी करण्याची गरज आहे. कारण भारताकडे या खनिजाचा प्रचंड साठा असल्याचे ते म्हणाले. औद्योगिक घडामोडी वाढल्यामुळे विजेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळातही विजेचा तुटवडा जाणवण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.