चर्चा तर होणारच..! अजित पवार, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र

चौफुला येथील कोविड हेल्थ सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी आले एकत्र ऑनलाइन

दौंड/वरवंड  -चौफुला (ता. दौंड) येथे आमदार राहुल कुल यांच्या संकल्पनेतील “डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ आणि “कोविड केअर सेंटर’च्या लोकार्पण प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन एकत्र आल्याने हे दोघे पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चेला जोर धरला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आमदार राहुल कुल यांचा हा स्तुत्य उपक्रम असून, दौंड तालुका आणि परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीने हे डेडीकेटेड कोविड केअर सेंटर फायद्याचे ठरणार आहे. ऑक्‍सिजन पुरवठा, तसेच रेमडेसिविरसाठी ते सातत्याने संपर्कात असून, या कोविड सेंटरसाठी लागणारी आवश्‍यक ती सर्व मदत राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमदार राहुल कुल हे ग्रामीण भागातील प्रश्‍नांची जाण असणो नेतृत्व आहे. राज्यातील पहिलाच डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, विलगीकरण उपक्रम त्यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून सुरू केला असून, असा उपक्रम राबविणारे ते राज्यातील पहिलेच आमदार असावेत. लवकर चाचण्या आणि उपचार केले तर पुढील 15 दिवसांतच करोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. गरिब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना या कोविड सेंटरचा फायदा होणार आहे.

सर्वच सुविधा मोफत – आमदार कुल
दीपगृह, देऊळगावगाडा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड केअर सेंटरमध्ये 100 ऑक्‍सिजन बेड व 200 विलगीकरण बेड तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सुसज्ज हॉस्पिटलच्या धर्तीवर 24 तास वैद्यकीय सुविधा, वॉर्डबॉय, नर्सेस, ऑक्‍सिजन लाइन्स, फोल्डेबल बेड्‌स, महिला व पुरुषांसाठी विभक्‍त विलगीकरण कक्ष, प्रत्येक बेडसाठी आवश्‍यक टेबल, वैद्यकीय उपकरणे, इतर साधने, घोषणा प्रणाली, प्रोजेक्‍ट्रर्स, रुग्णवाहिका, जनरेटर, सिक्‍युरिटी, औषधांसाठी स्वतंत्र कक्ष, इन हाऊस क्‍लीनिंग टीम, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत व या ठिकाणी दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णाचे संपूर्ण उपचार, औषधे, जेवण आदी सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.