दोन हजाराच्या नोटा कुठे आहेत? सरकारकडून छापणं बंद, ATM मधूनही गायब

सरकारकडून छापणं बंद, ATM मधूनही गायब

नवी दिल्ली – भारतीय चलनातील दोन हजाराची गुलाबी नोट तुम्ही अखेरची पाहिली त्याला किती दिवस झाले आहेत, असे प्रश्‍न नागरिक आता एकमेकांना विचारू लागले आहेत. कारण गेल्या जवळपास वर्ष-दोन वर्षात दोन हजाराची नोट वापरात दिसलेलीच नाही. तर मग या सगळ्या नोटा गेल्या तरी कुठे?

आता तुम्ही एटीएममधून पैसे काढायला गेलात तर तुम्हाला दोन हजार रुपयांची नोट मिळेल का? तुमच्यापैकी बहुतेकांचं उत्तर नाही असेल. सरकारने दोन हजार रुपयांची नोट बंद केली गेली तर नाही ना, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जर तुमच्या मनात याविषयी काही शंका असेल, तर लक्षात घ्या की, यापुढे 2000 रुपयांच्या नोटा छापणार नाहीत, असे सरकारने स्पष्ट केले होते. मार्च महिन्यात अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितले होते की, गेल्या दोन वर्षांत 2000 च्या नोटा छापल्या गेल्या नाहीत.

3 अब्ज 36 कोटी 20 लाखांच्या नोटा चलनात
अनुरागसिंग ठाकूर यांच्या या निवेदनानुसार, 30 मार्च 2018 पर्यंत 3 अब्ज 36 कोटी 20 लाखांच्या नोटा चलनात आल्या. तर 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत फक्त 2 कोटी 90 लाख 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. 2019-20 आणि 2020-21 दरम्यान 2000 रुपयांच्या बॅंक नोटांच्या छपाईशी संबंधित कोणताही आदेश सरकारने जारी केलेला नाही. म्हणजेच 2000 च्या नोटा यापुढे छापल्या जाणार नाहीत.

एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही
सरकारसमवेत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानेही आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. आरबीआयच्या आकडेवारीनुसार 2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या एकूण 354.2991 कोटी नोटा छापल्या गेल्या. त्याच बरोबर 2017-18 या आर्थिक वर्षात केवळ 11.1507 कोटी नोटा छापल्या गेल्या, जे नंतरच्या आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 4.6690 कोटीवर पोहोचल्या.

बॅंकेच्या एटीएममधील नोटांच्या कॅसेटमधून 2000 रुपयांच्या नोटांच्या कॅसेट काढून टाकल्या आहेत. दोन हजारच्या नोटांची कॅसेट 100 आणि 200 रुपयांच्या कॅसेटने बदलली आहे. यामुळेच कोणत्याही एटीएममधून दोन हजाराच्या रुपयांच्या नोटा मिळत नाहीत. काळ्या पैशाला आळा बसेल म्हणून सरकारने 2000 रुपयांच्या नवीन नोटा छापण्याचा निर्णय घेतला नाही. ही सोय तात्पुरती असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. शिवाय डिजिटल करन्सीला प्राधान्य देण्याचेही दावे केले गेले होते.

दोन हजार रुपयांची ही नोट वर्ष 2016 मध्येच छापली गेली. नोटाबंदीनंतर एक हजार रुपयांची नोट चलनातून कालबाह्य झाल्यानंतर 2000 रुपयांची नवीन चलनात आणली. अर्थ राज्यमंत्र्यांनीही म्हटले होते की, 2000 रुपयांची नोट छापणे बंद केले गेले आहे. मात्र, ज्या छापल्या गेल्या आअहेत, त्या सर्व नोटा चलन-स्वीकृत आहेत. शिवाय सध्या 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.