कर्जत – कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक निवडणुकीत मतदारांनी दोन्ही आमदारांना समसमान कौल दिला आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कर्जत तालुका स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल व आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलला मतदारांनी समान कौल दिला आहे. 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन्ही पॅनलच्या प्रत्येकी 9 जागा निवडून आल्या आहेत.
आ. शिंदे यांच्या पॅनलला क्रॉसवोटिंगचा फटका बसला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आले आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी कर्जत तालुक्यात वेगवान घडामोडी पहावयास मिळणार आहेत. बाजार समितीसाठी मंगल कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी सुखदेव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुरुवातीला सोसायटी मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली.
यामध्ये आ. शिंदे यांच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या सात उमेदवारांनी बाजी मारली तर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. ग्रामपंचायत मतदार संघात आमदार रोहित पवार यांच्या पॅनलने बाजी मारत तीन जागा जिंकल्या तर आ. शिंदे पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले. व्यापारी मतदार संघातील दोन्हीही जागा आ. पवार यांच्या पॅनेलने जिंकल्या आहेत तर हमाल मापाडी मतदार संघातील जागा आ.शिंदे यांच्या पॅनेलने जिंकली आहे.
विजयी उमेदवार– ग्रामपंचायत मतदारसंघ- बळीराम यादव (छत्री 376), राम कानगुडे (कपबशी 463), वसंत कांबळे (कपबशी 435), अमोल पाटील (कपबशी 434). व्यापारी- विजय भंडारी (कपबशी 215), प्रफुल्ल नेवसे (कपबशी 315). हमाल मापाडी – बापूसाहेब नेटके (छत्री 158). सोसायटी मतदारसंघ- मंगेश जगताप (छत्री 502), अभय पाटील (छत्री 566), काकासाहेब तापकीर (छत्री 527), रामदास मांडगे (छत्री 460), नंदकुमार नवले (छत्री 459), संग्राम पाटील (कपबशी 460), गुलाब तनपुरे (कपबशी 459), विजया गांगर्डे (छत्री 515), सुवर्णा कळसकर (कपबशी 478), श्रीहर्षं शेवाळे (कपबशी 497), लहू वतारे (छत्री 486).