पुणे -महापालिकेने केलेल्या श्वान गणनेमध्ये शहरातील भटक्या श्वानांची संख्या गेल्या चार वर्षांत तब्बल 42 टक्के घटल्याची माहिती आयुक्त विक्रमकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील लोकसंख्येचा विचार करता सध्या सुमारे 17 व्यक्तींमध्ये एक मोकाट श्वान असून करोनानंतर मोकाट श्वान दंशाची संख्याही वाढलेली आहे.
अशा प्रकारे श्वानांची गणना करणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. मोठ्या प्रमाणात मोकाट श्वान नसबंदी मोहीम राबविण्यात येत असल्याने ही संख्या घटल्याचे सांगण्यात येत आहे. ही श्वानांची संख्या शहराच्या जुन्या हद्दीतील असून अद्याप नव्याने समाविष्ट 23 गावात ही श्वानगणना झालेली नाही.
राज्यशासनाने 2017 मध्ये शहरात प्राणीगणना करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महापालिकेने ती केलेली नव्हती. त्यानंतर एका खासगी संस्थेने ही मोजणी केली होती. त्यात सुमारे 3 लाख 15 हजार मोकाट श्वान असल्याची नोंदणी झालेली होती.
त्यानंतर महापालिकेने 2021 मध्ये शासनाने पुन्हा महापालिकेस गणना करण्याबाबत कळविले होते. त्यानंतर पालिकेने एका खासगी संस्थेचे नेमणूक करून श्वान गणना केली असून त्यात आता 2023 मध्ये भटक्या श्वानांची संख्या 1 लाख 80 हजारांवर आली आहे.