छत्रपती संभाजीनगर – घरगुती भांडणात नवरा – बायको कोणत्या थराला जातील हे सांगणे अवघड आहे. रागाच्या भरात हे लोक काहीही करू शकतात… काही जण यावर प्रेमाने तोडगा काढतात. तर काहीजण असे काही करतात की अवघा समाजच तोंडात बोटे घालतो. याचा प्रत्येय सोमवारी छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना आला.
शहरातील एन-२ परिसरातील नालंदा सोसायटीत राहणाऱ्या नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचा राग मनात धरून बायकोने पेट्रोल टाकून चक्क घर पेटवून दिले. यामध्ये घरातील सर्व सामान जळून राख झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
नवरा – बायकोचे घरगुती कारणावरून भांडण झाले. हे भांडण एवढ्या विकोपाला गेले की, पत्नीने स्वतःच्या घराला आग लावली. घराला आग लावल्याने घरातील सोपा बेड आणि कपड्यांनी पेट घेतला. त्यामुळे या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. त्याची झळ आजूबाजूच्या घरांना देखील बसली. या आगीत ५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागताच स्थानिक नागरिकांनी याची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन विभागाचे कर्मचारी बंबासह घटनास्थळी दाखल झाले. तिसऱ्या मजल्यावर आग लागलेली असल्याने आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी मेहनत घ्यावी लागली. २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या यश आले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.