Lok Sabha Election 2024 । महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी राज्याला कुटुंबप्रमाणे जपले. त्यामुळे आज त्यांच्याबद्दल सर्वच क्षेत्रात आपुलकी निर्माण झाली. यापुढेही तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन शिवसेना नेते तथा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ कन्नड सोयगाव मतदारसंघात महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते.
शिवसेनेची आज गावागावात आणि मतदान केंद्रापर्यत यंत्रणा मजबूत आहे. त्यामुळे आता त्यात महाविकास आघाडीची भर पडल्यानंतर मोठी लीड उमेदवाराला मिळणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. या वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपले आजोबा पणजोबा कन्नड तालुक्यातील आहेत. वडील उपजीविका भागविण्यासाठी शहरात गेले असले तरी आम्हाला भूमिपुत्र म्हणून कन्नडची जाण आहे. स्थानिक उमेदवार असतांना मला नेहमीच सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे यापुढे आपला आशिर्वाद पाठिशी असू द्या, असे आवाहन चंद्रकांत खैरे यांनी केले.
आमदार उदयसिंग राजपूत यांनी कन्नड सोयगाव मतदारसंघातुन मोठी लीड देणार असल्याचे सांगितले. माजी आमदार, काँग्रेसचे महासचिव नामदेवराव पवार यांनी मोदी सरकारच्या योजनांचा फर्दाफाश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार किशोर पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना निवडणून आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.
हर्षवर्धन जाधव यांचा यंदाही अर्ज
कन्नड विधानसभा मतदार संघातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यातच खैरे यांनी कन्नडमध्ये मेळावा घेत एका अर्थाने हर्षवर्धन जाधव यांनी आव्हान दिले आहे.