छत्रपती संभाजीनगर – एकीकडे लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना देखील राज्यात महायुतीच्या काही जागांचा तिढा सुटलेला नाही. अशातच आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) व नाशिकमधील जागेचा तिढा सुटल्याचे समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगरचा महायुतीचा उमेदवार ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु येत्या 25 एप्रिल रोजी भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाविकास आघाडीने याआधीच छत्रपती संभाजीनगरासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे. या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार यावर चांगलीच चर्चा सुरू होती.
शिवसेना-भाजप यांच्या युतीत हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिलेला आहे. यावेळी मात्र भाजप कडून देखील या जागेवर आपला दावा सांगितला जात होता. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, कॅबिनेट मंत्री अतुल सावे हे देखील लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यामुळे या जागेवर उमेदवाराची घोषणा करणे टाळले जात होते. तर महायुतीत तिढा देखील निर्माण झालेला होता. दरम्यान, आता संदीपान भुमरे यांच्या नावावर मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.
एमआयएमकडून पुन्हा जलील –
एमआयएमकडून येथे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर वंचितकडून अफसर खान यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात विशेष करून भुमरे विरुद्ध खैरे व जलील यांच्यात चांगलीच चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.