पुणे -“महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बचतगटांनी मोलाची भूमिका बजावली आहे. मात्र, बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना केवळ सण-उत्सवांच्या दिवसात बाजारपेठ उपलब्ध करून न देता पूर्ण वर्षभर विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी,’ अशी सूचना पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.
मनपा समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील बचतगटांसाठी शहरात पाच ठिकाणी दिवाळी बचत बाजारांचे आयोजन करण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानातील या उपक्रमाचे उद्घाटन आमदार मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनपा उपायुक्त नितीन उदास, मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, असंग पाटील, रामदास धावडे, राजेंद्र मोरे, विवेकानंद बडे, यांच्यासह बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या.
दरम्यान, अशा बचत बाजारांसाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मिळवून देण्याचे आश्वासनही आमदार मिसाळ यांनी दिले. प्रदर्शनाची वेळ 8 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 असणार आहे.
दरवर्षी महापालिकेच्या या बचत बाजारात जवळपास 50 लाखांपेक्षा अधिकची उलाढाल होते. या बचत बाजारांमध्ये पणत्या, आकाशदिवे, कपडे, दिवाळीसाठीचे इतर साहित्य बचतगटांकडून रास्त भावात विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले असून, जास्तीत जास्त पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी यावेळी केले आहे.
येथे भरले आहेत बचत बाजार
- पु.ल. देशपांडे उद्यान – सिंहगड रस्ता
- टेलिफोन एक्सचेंजसमोर – बाणेर
- नवीन भाजी मंडई- वडगावशेरी
- नथुजी मेंगडे जलतरण तलाव – कर्वेनगर
- कात्रज दूध डेअरी मैदान – कात्रज