पुणे -मराठी नाट्य परिषद आणि नाट्यरसिक यांच्यातील संपर्क तुटला आहे. अखिल भारतीय म्हणतो खरे पण, मुंबईतील नाट्यसंस्थांच्या नाटकांचे प्रयोग विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये होऊ शकत नाहीत. हा संपर्क पुन्हा जोडला गेला पाहिजे, अशी अपेक्षा अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली.
“आम्ही सारे ब्राह्मण’ आणि “ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ या नियतकालिकांच्या वतीने महाराष्ट्र चित्पावन संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते दामले यांना “ब्राह्मण भूषण’ पुरस्कारप्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने राजेश दामले यांनी प्रशांत दामले यांची मुलाखत घेतली. याच कार्यक्रमात पत्रकार सागर देशपांडे यांना “इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार’, मानसी बडवे यांना “डॉ. रामचंद्र देखणे युवा कीर्तनकार पुरस्कार’ आणि “देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थे’ला “भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, नियतकालिकांचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी, संचालक संजय ओर्पे उपस्थित होते.
राज्य शासनाकडे पाठपुरावा करून नाट्यगृहांची सुधारणा करण्याबरोबरच सामान्य नाट्यरसिकाला नाट्य परिषदेचे सभासद करून घेणे, परिषदेचे कामकाज रसिकाभिमुख करण्याचा प्रयत्न करण्यावर भर देऊ, असेही दामले म्हणाले.
…म्हणून राजकीय व्यासपीठ टाळले
“मी अभिनेता आहे नेता नाही, असे विनम्रपणे सांगून आजपर्यंत राजकीय व्यासपीठावर जाण्याचे टाळले आहे. रंगमंचावरचे तीन तास मी कलाकार असतो. एरवी मी तुमच्यासारखाच माणूस आहे. त्यामुळे माणूस म्हणून मला राजकीय भूमिका आहे. परंतु ती मांडायची की नाही, याचे स्वातंत्र्य कलाकाराला असले पाहिजे. ते स्वातंत्र्य मी घेतो,’ असे दामले म्हणाले.