सिंहगडरस्ता – सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी भागात विकासनगर येथील चौकात महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, ढाल-तलवार आणि भाले असे ऐतिहासिक शिल्प उभारण्यात येणार होते. परंतु, या शिल्पाचे काम अनेक दिवसांपासून रेंगाळले आहे. एका राजकीय “हट्टा’मुळे अर्धवट अवस्थेत असलेल्या या शिल्पाचे काम महापालिका केंव्हा करणार? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विकासनगर येथील चौकात उभारण्यात आलेल्या या अपूर्णावस्थेतील शिल्पासाठी जनतेच्या कराचे लाखो रुपये अडकून पडले आहेत. याशिवाय यातून इतिहासाचाही अपमान होत असल्याची भावना नागरिकांच्या मनात आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित निर्णय घेऊन या शिल्पाचे काम पूर्ण करावे आणि हा नवीन झालेला चौक सुशोभित करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
मंजूर नकाशाप्रमाणे प्रशासनाकडून या शिल्पाचे काम सुरू होते. परंतु, काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी या शिल्पामध्ये काही राजकीय व्यक्तींच्या प्रतिमा टाकण्याचा प्रस्ताव दिला होता. मंजूर नकाशाप्रमाणे या नवीन मूळ व्यक्ती प्रतिमेचा प्रस्ताव प्रशासनाने पाठवला होता त्याची मंजुरी आलेली नाही. दरम्यानच्या काळात करोना आला आणि त्यामुळे हे काम थांबले आहे. मंजूर नकाशाप्रमाणे हे काम त्वरित करता येईल.
– अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग