मुंबई – सूर्यकुमार यादवची वादळी खेळी व निहाल वधेरासह ईशान किशनने केलेली आक्रमक फलंदाजी यांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने मंगळवारी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर मुंबईने यंदाच्या स्पर्धेत साखळी लढतीत यापूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढला.
बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरुवात थाटात झाली. सलामीवीर ईशान किशनने धडाकेबाज फलंदाजी करत कर्णधार रोहित शर्मासह संघाला अर्धशतकी सलामी दिली. मात्र, ईशान 21 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांसह 42 धावांवर बाद झाला. या भागीदारीत रोहितचा वाटा केवळ 7 धावांचा होता. रोहितही अत्यंत दुर्दैवीरीत्या 7 धावांवर पायचित बाद झाला व त्याची अपयशाची मालिका याही सामन्यात कायम राहिली. हे दोघे परतल्यावर निहाल वधेरा व सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला. त्यांनी बंगळुरूच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला व 139 धावांची भागीदारी केली. या जोडीने संघाचे शतकच नव्हे तर दीडशतकही सर्वात जलद साकार केले.
दरम्यान सूर्यकुमारने वादळी फलंदाजी करत चौकार व षटकारांची आतषबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले.
त्यानंतर तर सूर्यकुमारने आणखी आक्रमक फलंदाजी केली. मात्र, त्याच जोशात अनावश्यक फटका मारून तो 83 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने अवघ्या 35 चेंडूत 7 चौकार व 6 षटकारांची आतषबाजी केली. यावेळी मुंबईला विजयासाठी अवघ्या 8 धावांची गरज होती. निहाल वधेरा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर होता. त्याच्या जोडीला आलेला टीम डेव्हिड पहिल्याच चेंडूवर परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने निहालला साथ दिली. निहालने षटकार फटकावताना अर्धशतकही पूर्ण केले व संघाचा विजयही साकार केला. त्याने 34 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 52 धावांची खेळी केली. ग्रीन 2 धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, विराट कोहलीसह प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर कर्णधार फाफ डुप्लेसी व ग्लेन मॅक्सवेल यांनी केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बंगळुरूने मुंबई इंडियन्सविरुद्ध 6 बाद 199 अशी मजल मारली.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत बंगळुरूला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय योग्य ठरवताना जेसन बेहरेनड्रॉफने विराट कोहलीला पहिल्याच षटकात तंबूचा रस्ता दाखवला व थाटात सुरुवात करून दिली. त्यानंतर त्याने अनुज रावतला बाद करत बंगळुरूची स्थिती 2 बाद 16 अशी बिकट केली.
त्यानंतर मात्र कर्णधार फाफ डुप्लेसी व ग्लेन मॅक्सवेल यांनी आक्रमक फलंदाजी केली. त्यांनी संघाचे अर्धशतक फलकावर लावले. त्यांनी संघाचे शतकही फलकावर लावताना तिसऱ्या गड्यासाठी 120 धावांची भागीदारी केली.
या दोघांनीही अर्धशतके साकार केली. मॅक्सवेल 33 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी करून परतला. पाठोपाठ महिपाल लोमरोरनेही निराशा केली. एका बाजूने डुप्लेसी अर्धशतक पूर्ण करून भक्कमपणे फलंदाजी करत होता. त्याला साथ देण्यासाठी दिनेश कार्तिक खेळपट्टीवर आला.
मात्र, वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात भक्कम उभा राहिलेला डुप्लेसी अनावश्यक फटका मारून 65 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 41 चेंडूत 5 चौकार व 3 षटकार फटकावले. त्यानंतर कार्तिकने केदार जाधवच्या साथीत पुन्हा एकदा डाव सावरला. या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत वेगाने धावा जमवल्या. मात्र, कार्तिकही आततायी फटका खेळून बाद झाला. त्याने 18 चेंडूत 30 धावा करताना 4 चौकार व 1 षटकार फटकावला. त्याने केदारसह 39 धावांची बहुमोल भागीदारी केली. कार्तिक परतल्यावर केदारने वनिंदू हसरंगाच्या साथीत थोडीफार भर घातली व बंगळुरूला 20 षटकांत 6 बाद 199 अशी समाधानकारक मजल मारून दिली.
कोहली पुन्हा अपयशी
बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली या सामन्यातही निराशाजनक फलंदाजी करत चार चेंडूत अवघी एक धाव काढून बाद झाला. यंदाच्या स्पर्धेत थाटात सुरुवात केलेल्या कोहलीला नंतर मात्र सातत्य राखता आलेले नाही.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर बंगळुरू – 20 षटकांत 6 बाद 199 धावा. (ग्लेन मॅक्सवेल 68, फाफ डुप्लेसी 65, दिनेश कार्तिक 30, वनिंदू हसरंगा नाबाद 12, केदार जाधव नाबाद 12, जेसन बेहरेनड्रॉफ 3-36, कॅमेरून ग्रीन 1-15, कुमार कार्तिकेय 1-35, ख्रिस जॉर्डन 1-48). मुंबई इंडियन्स – 16.3 षटकांत 4 बाद 200 धावा. (सूर्यकुमार यादव 83, ईशान किशन 42, वनिंदू हसरंगा 2-53, विजयकुमार वैशाक 2-37).