रिऍल्टी क्षेत्रात अजूनही आशावादाचा अभाव

तिसऱ्या तिमाहीतील भावनांक कमी पातळीवर

पुणे – केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने बऱ्याच उपाययोजना करूनही तिसऱ्या तिमाहीत (जुलै-ऑगस्ट) रिऍल्टी क्षेत्रात आशावादाचा अभाव असल्याचे जाणवले आहे. सरकारने केलेल्या उपाययोजना या फक्त पुरवठा वाढविण्याबाबत आहेत, मागणी वाढविण्याबाबत नाहीत. त्यातही फक्त किफायतशीर घरांचा पुरवठा वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षेत्रात आशावाद परतलेला नाही, असे एका अहवालावरून स्पष्ट होते.

उद्योजकांची संघटना फिक्की आणि रिअल इस्टेट संबंधातील माहितीचे संकलन करणाऱ्या नॅरडेको (एनएआरईडीसीओ) आणि नाईट फ्रॅंक या संस्था डेव्हलपर्स, प्रायव्हेट इक्विटी फंड, बॅंका आणि एनबीएफसीसह कन्सल्टंट बरोबर चर्चा करून या क्षेत्रातील आशावादाचा भावनांक तयार करीत असतात. जुलै- सप्टेंबरसाठीच्या तिमाहीतील हा भावनांक केवळ 42 इतका मोजला गेला आहे. हा भावनांक 50 पेक्षा जास्त असल्यानंतर आशावाद असल्याचे समजले जाते. नोटाबंदीच्या काळात हा भावनांक 42 पर्यंत घसरला होता. जानेवारी ते मार्च या काळातील हा भावनांक 47 होता तर एप्रिल ते जून या काळातील हा भावनांक 62 इतका होता. आता तो कमी होऊन 42 इतका झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे पुढील सहा महिन्यांत तरी यात फारशी वाढ होण्याची शक्‍यता नसल्याचे सांगण्यात आले.

केंद्र सरकार व रिझर्व्ह बॅंकेने घरांचा पुरवठा वाढावा त्यातल्या त्यात किफायतशीर घरांचा पुरवठा वाढावा म्हणून प्रयत्न केले आहेत. मात्र, नागरिकांना दीर्घ पल्ल्याच्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे त्यांच्याकडून मागणी कमी झाल्याने निराशा पसरलेली आहे.
– शिशिर बैजल, नाईट फ्रॅंक इंडिया व्यवस्थापकीय संचालक


बांधकाम सुरू असलेल्या तसेच तयार घरांच्या किमती सध्या गेल्या काही काळाच्या तुलनेत सर्वांत कमी झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे व्याजदरही कमी आहेत. मात्र, तरीही ग्राहक पुढे येण्यास तयार नाहीत.
– निरंजन हिरानंदानी, एनएआरईडीसीओचे अध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.