पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पेठा आहेत. या बहुतांश पेठांमध्ये वेगवेगळ्या बाजारपेठ, मोठी लोकवस्ती, महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था तसेच काही प्रमुख शासकीय कार्यालयेही आहेत. परिणामी गेल्या काही वर्षांत या भागातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. ही कोंडी वेगवेगळ्या उपाययोजना तसेच सक्षम नियोजनाद्वारे सोडविल्यास ती सहज सुटणारी असल्याने ती सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले. मात्र, ही कोंडी सोडविताना, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही रस्त्यावरून सुरक्षित चालण्यासाठी पदपथ उपलब्ध करून देण्यास आपले प्राधन्य राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
कसबा मतदारसंघात प्रमुख्याने जुन्या पुण्याचा भाग असून या भागातील रस्ते अरूंद आहेत. त्याचवेळी वेगवेगळ्या बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, दाट लोकवस्तीचा हा परिसर आहे. नागरिकरणामुळे शहराची लोकसंख्या वाढतानाच, शहरातील वाढत्या वाहनांमुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी योग्य आणि दिर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.
गेल्या 20 वर्षांत लोकप्रतिनिधी म्हणून आपण वेळोवेळी त्यासाठी पाठपुरावा केला. ही वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी या भागात वाहनतळ विकसित होणे गरजेचे आहे. मात्र, दुर्देवाने महापालिकेतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेच्या कालावधीत वाहनतळासाठीच्या सुविधेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. याशिवाय, काही भागांत रस्ते रूंदीकरण, रस्त्यावरील पार्किंग याबाबतही आवश्यक असलेले निर्णय घेण्यात त्यांच्याकडून दिरंगाई करण्यात आली. त्याचे परिणाम आज कसबा मतदारसंघातील नागरिकांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे. त्या अंतर्गत अल्पकालीन आणि दिर्घकालीन उपाययोजनांचे आराखडे करण्यात येत असून त्या माध्यमातून लवकरच ही कोंडी फोडण्यासाठी काम सुरू केले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
जास्तीत जास्त वाहनतळे विकसित करण्यावर भर
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मतदारसंघात जास्तीत जास्त वाहनतळे विकसित करण्यावर आपला भर राहणार आहे. दाट लोकवस्ती आणि अरूंद रस्त्यांमुळे वाहनतळांसाठी जागांची कमतरता पाहता उपलब्ध जागेवर अत्याधुनिक बहुमजली पार्किंग उभारणे, काही प्रमुख रस्त्यावर कोंडी फोडण्यासाठी वॉकिंग प्लाझा, चुकीच्या पद्धतीने रस्ते अडवून केले जाणारे पार्किंग बंद करणे, रस्त्याची पुनर्रचना करणे, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याने सहज चालता यावे यासाठी रस्त्यांवर पदपथ विकसित करणे या उपाययोजनांवर आपला भर राहणार आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या माध्यमातून यासाठी आराखडे करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, या भागात रस्ते अरूंद असल्याने चक्राकार पण निश्चित उपलब्ध होऊ शकणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यास या भागात येणारी वाहनांची संख्या कमी होणार असल्याने त्यासाठीही आपला प्रयत्न राहणार असल्याचे टिळक यांनी स्पष्ट केले.