सातारा – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील खटाव पुसेगाव विभागात आमदार शशिकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. त्यांच्यामुळे जनतेला हक्काचा आपला आमदार मिळाला आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या, प्रसंगी अडचणीला धावून जाणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे यांना खटाव पुसेगाव जिल्हा परिषद गटातून पंधरा हजारांपेक्षा अधिक मताधिक्य देणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप विधाते यांनी दिली.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे व लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ विसापूर, जाखणगाव ,दरूज, कटगूण, निढळ, रणसिंगवाडी, वेटणे, पांगरखेल, फडतरवाडी, करंजखोप, बुध, राजापूर या गावांतील मतदारांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. या दौऱ्यात सागर साळुंखे, संतोष साळुंखे, दगडू दादा शिंदे, जितेंद्र शिंदे, नवनाथ वलेकर, उदय कदम, वसंतराव जाधव, श्रीमंत निर्मळ, रोहित लावंड, मधुकर लावंड, सुरेशशेठ जाधव, मधुकर पाटोळे, चंद्रकांत शिंदे, विराज शिंदे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले, “मतदारसंघातील विकासाची कामे करताना मी कधीही सूडाचे राजकारण केले नाही. कोण कोणत्या गटाचा हे न पाहता प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले.
त्यामुळेच सर्व समाज बांधवांनी मला आपला माणूस म्हणून प्रेम दिले. गेली दहा वर्षे मतदारसंघातील प्रत्येक मतदारांशी असलेला माझा ऋणानुबंध हा पाठबळ देणार आहे.” खटाव विभागात रस्ते, सभामंडप ,पाझर तलाव, बंधारे, व्यायामशाळा यांसह विविध विकास कामे वाडीवस्तीवर पोहचवून आ. शिंदे यांनी मतदारांची नाळ जोडली आहे. शरद पवारांचा निष्ठावंत व लोकांसाठी 24 तास उपलब्ध असणारा नेता या भागाला मिळाला आहे हे मतदारांचे भाग्य आहे, असे विधाते यांनी सांगितले. तरुण पिढी बिघडविण्याचे काम करणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराचा पत्ता कायमचा कट करण्याचा निर्धार मतदारांनी या निवडणुकीत केला आहे, असा दावा त्यांनी केला.