मुंबई – पीएमकेअर्स हा निधी सरकारी निधी नाही तथापि या निधीच्या संबंधात पंतप्रधानांचे छायाचित्र अथवा राष्ट्रध्वजाचे चित्र लावण्यास कोणतेही निर्बंध नाहीत असे प्रतिपादन पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
पीएमकेअर्स साठी मोदी किंवा राष्ट्रध्वजाचे चित्र वापरण्यास विरोध करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहे त्या अनुषंगाने पंतप्रधान कार्यालयाने तेथे जे प्रतिज्ञापत्र आज सादर केले आहे त्यात त्यांनी हा दावा केला आहे.
कॉंग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली असून त्यात त्यांनी पीएमकेअर्सला पंतप्रधानांचा अथवा राष्ट्रध्वजाचा फोटो वापरण्यास विरोध करावा तसेच त्यांना भारत सरकारचे राष्ट्रीय चिन्ह वापरण्यासही मनाई करावी अशी मागणी केली आहे. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने वरील प्रतिपादन केले आहे पीएमकेअर्स हा फंड पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंदवला गेला आहे. हा ट्रस्ट सरकारी नाही असेही पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.