नवी दिल्ली – ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर उद्या, बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दोन्ही राज्यांच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दोन्ही राज्यांची यासंदर्भातील याचिका एकत्रितपणे न्यायालय ऐकणार आहे. 5 डिसेंबरचा आदेश मागे घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय याआधीच दिला आहे. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करून त्यानंतरच आरक्षण द्यावे, असा निर्णय न्यायालयाने दिला होता.
त्यावर मध्य प्रदेश सरकारने विधिमंडळात ठराव करून निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्यपालांमार्फत निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसाच ठराव महाराष्ट्र सरकारनेही केला आहे. यामुळे न्यायालय कोणता निर्णय देते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.